Saturday 28 June 2014

Posted by samirsinh dattopadhye on 04:52 No comments

Aniruddha Bapu Anubhav - Jalgaon

 - सुनंदावीरा बर्‍हाटे, जळगाव

बाहेरगावच्या श्रद्धावानांसाठी ‘बापू आमच्या गावी येणार’ म्हणजे तो आनंदोत्सवच असतो. मग अशा ह्या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथील प्रत्येक श्रद्धावान आसुसलेला असतो. अशावेळी एखाद्या श्रद्धावानाच्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि त्याला वाटते की आपण ह्या आनंदोत्सवाला मुकणार की काय ? पण ती सद्गुरु माऊली असं होऊ देत नाही...

परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!
आम्ही बापूंच्या उपासनेत गेल्या दहा वर्षांपासून येत आहोत आणि खूप आनंद मिळवीत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला बापूंचे खूप लहानमोठे अनुभव आलेले आहेत. दिनांक १६ ऑक्टोबर २०११ हा आपल्या जळगावच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा आनंदोत्सवाचा दिवस होता. ह्या दिवशी बापू जळगावला येणार होते. येथील सर्वच बापूभक्त खूप उत्साही आणि आनंदी होते.

दिनांक १० ऑक्टोबरला मला माझ्या नणंदेच्या शेताच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी यावल ह्या गावी जावे लागले. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं टू-व्हीलरवरून यावल गावी गेलो. तिकडून परत येत असतांना नशिराबाद गावाजवळ आमची गाडी स्लिप झाली. मी पडले आणि डोकं आपटल्यामुळे बेशुद्ध झाले. रस्त्यावर लोकांची गर्दी जमली.

लोकांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडले. मी थोड्या वेळातच शुद्धीवर आले. शुद्धीवर येताच प्रथम मला आठवण झाली माझ्या पर्सची. त्या पर्समध्ये शेताच्या व्यवहाराची रक्कम होती. तिचे काय झाले असेल ह्याची धाकधूक होतीच. मी पर्स शोधली, तर ती एका बाजूला पडलेली होती. मी माझ्या मिस्टरांना हाताने पर्स दाखविली. त्यांनी ती पर्स लगेच उचलून त्यातली रक्कम तपासून घेतली. सद्गुरु बापूंच्या कृपेमुळे सर्व रक्कम सुरक्षित होती.

रक्कम सुरक्षित असल्याचे पाहिल्यावर आता लक्ष मला झालेल्या इजेकडे गेले. माझ्या डोळ्याला एक इंचाची जखम झालेली होती आणि पाठीला खरचटलेले होते. लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये नेतो. परंतु मी म्हटले, ‘‘मला थोडा वेळ शांत बसू द्या.’’ १५-२० मिनिटांनी आम्ही आमच्याच गाडीवरून हॉस्पिटलमध्ये गेलो. नंतर घरी गेलो.

मला सारखे वाटत होते की आता पाच दिवसांनी बापू येणार, मग आपल्या ह्या अवस्थेत आपल्याला सेवेला जाता येणार की नाही? परंतु त्या अकारण करुणामयी सद्गुरुतत्त्वाने मला ह्या पाचच दिवसांमध्ये बरे केले व मला आनंदोत्सवाचा आनंद मिळवून दिला.

बापूंनी मला आणि शेताच्या रक्कमेला सुरक्षितपणे घरी पोहचविले. खरंच! बापू प्रत्येक भक्ताची किती काळजी घेत असतात!
अशा ह्या आपल्या सद्गुरु बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम!!

असाच माझा दुसरा अनुभव. २००६ साली बापूंनी ‘श्रीवर्धमान व्रताधिराजा’ची घोषणा केली. तेव्हापासून मी माझ्या मिस्टरांना दरवर्षी वर्धमान व्रत करायला सांगत असे. परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये शांती, साखरपुडा, व्रतवैकल्यं ह्यांसारखे खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे वर्धमानव्रतामध्ये पाळावयाचे तूरडाळ, चणाडाळ ह्यांचे पथ्य पाळले जाणार नाही म्हणून ते वर्धमानव्रत करीत नसत.

२०१२ साली मी त्यांना कळकळीने सांगितले की ह्यावर्षी वर्धमानव्रत कराच. त्यांनीही व्रतकाळातील पथ्य न पाळू शकण्याचे भय बाजूला ठेवून अगदी मनापासून वर्धमानव्रत केले आणि मुख्य म्हणजे पथ्यही पाळले.
मिस्टरांनी पहिल्यांदाच व्रताधिराजाचे पालन केले म्हणून मला आनंद तर झालाच. पण खरं तर हे पालन बापुरायानेच त्यांच्याकडून करून घेतले होते - त्यांच्यावर ओढवू घातलेल्या संकटामध्ये त्यांना कवच प्रदान करण्यासाठी, हे आमच्या नंतर लक्षात आले.

वर्धमानव्रताचे उद्यापन झाल्यानंतर दोन दिवसांनी माझे मिस्टर रात्री नऊ वाजता टी.व्ही. पाहत होते. टी.व्ही. पाहता पाहता ते अचानक कॉटवरून खाली पडले. मला एकदम आवाज आला म्हणून मी लगेच तिथे आले. पाहिले तर काय? त्यांना कसलीच शुद्ध नव्हती आणि डोळेही एकदम उघडे पडलेले. मी तर घाबरूनच गेले.

मी त्यांचे डोळे दाबून धरले आणि मुलांना आवाज दिला. ही अशी कोणाची अवस्था आम्ही प्रथमच पाहत होतो. आम्ही त्यांना हलवून उठवत होतो, तरी त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे आता काय होणार, ह्या विचाराने आमचा जीव भेदरून गेला होता.

मी मुलाला लगेच आमच्या घरातील आपल्या संस्थेची उदी आणायला सांगितली. ही उदी त्यांच्या छातीला-कपाळाला लावली. थोडी उदी तोंडामध्ये टाकली.
....आणि थोड्याच वेळात ते शुद्धीवर आले!

त्यांनी आम्हांला विचारले, ‘‘मला काय झाले होते? बरे झाले मी वर्धमानव्रत केले. त्यामुळे आज माझे आयुष्य वर्धमान झाले.’’

आम्ही सर्व बापूभक्त येता-जाता, दुःखात-आनंदात, सोयर-सुतकात उदी लावत राहतो. ही उदी आम्हाला संकटामध्ये कवच प्रदान करते. त्यामुळे आपल्यावरील येणार्‍या संकटांची तीव्रता कमी होते. ह्या प्रसंगात उदीने औषधाचे काम केले आणि आमच्यावर आलेले संकट टळले. खरंच, ‘कलियुग में एक ही त्राता| अनिरुद्धराम रे’.
परमपूज्य बापूंना आमचे कोटी कोटी प्रणाम !!!
असा सद्गुरु आम्हाला जन्मोजन्मी मिळो!

0 comments:

Post a Comment