Saturday 2 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 05:02 No comments
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan-Jalgaon

ऑपरेशन म्हटलं की सर्वसामान्य माणसाला भीती वाटतेच. त्यात पुन्हा डॉक्टरांनीही ऑपरेशनबद्दल भीती दाखवली तर मग भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. मात्र ह्या अनुभव लिहिणार्‍या श्रद्धावानाने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वाचा डॉक्टर’ असणार्‍या सद्गुरुंचा वरदहस्त असल्यावर कुठलीच भीती आपल्या मनाचा ताबा घेत नाही हे निश्चित !
- केवलसिंह रजपूत, जळगाव

 
मला माझे मामेभाऊ राजेंद्रसिंह पाटील, धुळे यांच्याकडून दि.१०.७.२००१ रोजी बापूंबद्दल माहिती मिळाली. अर्थात ही सद्गुरुंचीच योजना असल्यामुळे मनात कोणताही कुतर्क, शंका, कुशंका न येता मी व माझा परिवार उपासना केंद्रावर जायला लागलो.

साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे ‘माझा माणूस कुठेही असो, त्याच्या पायाला दोर बांधून मी खेचून आणतो’. आमच्या बाबतीतही तसेच झाले. बापूंच्या कृपेने थोडी फार भक्ती व सेवा करत आम्ही पूर्ण बापूमय झालो.

परंतु कर्माच्या अटळ सिद्धांताप्रमाणे प्रारब्ध भोग भोगावेच लागतात हेही खरे आणि सद्गुरु मनःसामर्थ्य देवून कठिण प्रारब्ध सौम्य करतात हेही तितकेच खरे. फक्त आपला ‘विश्वास’ असावा लागतो याबद्दलचा हा माझा अनुभव.

मी दि.१-१०-२०११ रोजी काविळ व मधुमेहामुळे आजारी झालो. त्यामुळे अंमळनेर येथील स्थानिक दवाखान्यात दाखल झालो. ८-९ दिवस उपचार करुन काविळ थोडी कमी झाली. परंतु नंतर परत काविळ उलटली आणि सर्व उपाय करुनही कमी न झाल्यामुळे, आमचे आश्रयस्थान प.पू. सुचितदादा ह्यांच्याशी संपर्क करायचा ठरवला. डॉ.संजीवसिंह चव्हाण यांनी फोन करुन अपॉइंटमेंट घेतली व त्यांनी स्वतः मला २९-११-२०११ ला प.पू. दादांशी भेट घालून दिली.

प.पू. दादांनी फाईल पाहून डॉ.लिनम पडेलकरांना डॉ.वाडीयार यांच्याशी संपर्क करायला लावला. त्याप्रमाणे डॉ.वाडियार यांनी मला तपासून एमआरआय व अ‍ॅडव्हान्स इन्डोस्कोपि करुन घेतली. तपासांती २०/१/२०१२ पर्यंत लिव्हरचे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले व तेही चेन्नई येथे.

हे ऐकून माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भिती निर्माण झाली नाही. कारण एकच, ‘एक विश्वास असावा पुरता...’. त्याप्रमाणे २०/१/२०१२ ला चेन्नईला अ‍ॅडमिट झालो. तेथील स्थानिक डॉक्टरांनी बरीचशी भितीदायक माहिती सांगितली. ‘८-९ तासांचे ऑपरेशन आहे, वयाच्या मानाने कठिणच आहे’, वगैरे वगैरे माहिती ते देत होते. परंतु प.पू. दादांनी मला तीन वेळा अनिरुद्ध चलिसा म्हणण्यास सांगितले होते. अनिरुद्ध चलिसा व त्यासोबत असणारा माझा दृढ विश्वास ह्यामुळे मी सकाळी आनंदात ऑपरेशनसाठी गेलो.

ऑपरेशन एकदम यशस्वी झाले. एवढेच नाही तर सद्गुरुंच्या कृपेने, मी वयस्कर असूनही, माझ्या शरीराने खूप छान साथ दिली व मी लवकर बरा झालो. ज्या डॉक्टरांनी मला आधी भीती दाखवली होती, ते तीन दिवसांनी मला भेटले व म्हणाले, ‘‘सॉरी. मी तुम्हाला जरा जास्तच भितीदायक सांगितले. तसे काहीही झाले नाहीच पण तुमची रिकव्हरी पाहता हा मला चमत्कारच वाटतो.’’ मला मात्र खात्री होती की माझा ‘विश्वाचा डॉक्टर’ तिथे असल्यामुळे हे सर्व घडले होते आणि म्हणूनच मला कसलीच भिती जाणवली नव्हती.

याप्रमाणे प्रारब्धभोग हलके करुन बापूंनी दुर्गमतेकडून मला सुगमतेकडे नेले.

बापूराया, माझी अल्प भक्ती असतांना, तू माझ्यासाठी एवढे केलेस ! ह्या तुझ्या लाभेवीण प्रेमाबद्दल मी तुझा खूप ऋणी आहे. बापूराया, जन्मोजन्मी मी असाच तुझ्या चरणांशी असू दे हेच माझे मागणे आहे.

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment