Wednesday 6 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 01:26 No comments
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

संकट हे कोणालाच चुकले नाही. प्रारब्धानुसार ज्याला त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना हा करावाच लागतो. फरक कुठे होतो, तर जो सद्गुरुंच्या छत्रछायेखाली आहे, त्याला कुठून ना कुठून संरक्षण मिळते, संकटात अचानक कुठूनतरी मदत उभी राहते, मनाधार मिळतो, हा बहुतेक सद्गुरुभक्तांचा अनुभव आहे.
 - जीजाबराव सोनवणे, जिराळी (जळगाव)

मी २००४ मध्ये अनिरुद्धबापूंच्या सेवाकार्यात प्रथम भाग घेतला. त्यानंतर मला सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अनेक अनुभव आले.
मला पहिला अनुभव २००८ मध्ये आला. माझी पत्नी, चार मुली व मोठा मुलगा असा माझा परिवार आहे व बापूंच्या कृपेने सुखात चालत होता. माझी दोन नंबरची मुलगी गरोदर होती. तिची प्रसूतीची तारीख दिली होती, ३० जुलै २००८. म्हणून मी माझ्या मुलीस भेटावयास २६ जुलैला जळगावमधील मु.पो. मोहाडी येथे गेलो.

योगायोगाने ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी, म्हणजे शनिवारी मुलीचे पोट दुखावयास सुरुवात झाली. त्यावेळी माझ्या मुलाने गावातील नर्सला बोलावले. तिने खूप प्रयत्न केले परंतु यश येत नव्हते. तेव्हा त्या नर्सने सांगितले की तुम्ही कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा.

घरातील मंडळी घाबरली. आता बापूंशिवाय कोण आधार? म्हणून लगेच बापूंचे नामस्मरण सुरू केले. आमच्याजवळ असलेली संस्थेची उदी तिला पाण्यात टाकून पाजली व थोडी कपाळास लावली व बापूंना सांगितले की ‘बापू, तुम्हीच तुमच्या नातवाला सांभाळा!’

तोच काय चमत्कार! तेवढ्यात माझ्या मुलीला - स्वतः बापूच आमच्या घराच्या उंबरठ्याजवळ येऊन उभे राहिले आहेत असे दृश्य दिसले. मुलगी ओरडलीच, ‘‘अगं आई, बघ बापू आले’’ आणि असे म्हणत तिने बापूंचा जयजयकारही केला - ‘जय बापूराया, जय बापूराया’!

इतके होतेय तोच बापूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद दिला असे तिला दिसले; आणि अक्षरशः त्यानंतर लगेचच मुलीची डिलिव्हरी झाली सुद्धा....तिला मुलगा झाला! अनुभवी नर्सलाही जी डिलिव्हरी गुंतागुंतीची (‘कॉम्प्लिकेटेड’) वाटत होती, ती माझ्या बापूंच्या कृपेने किती सुलभरित्या झाली! खरंच बापूराया, आमच्यासारख्या सर्वसामान्य भक्ताने मारलेल्या हाकेलाही धावून आलास....मी तुझे कसे ऋण फेडू?

दुसरा अनुभव असा की आम्ही जिराळी व इंधवे केंद्र मिळून १४ माणसे एकत्र खाजगी गाडी करून गुरुवार दि. १७ डिसेंबर २००९ रोजी ठीक ६ वाजता बापूंच्या प्रवचनासाठी बांद्रा न्यू इंग्लिश स्कूल येथे गेलो. त्या वेळेस बापू गुरुक्षेत्रम्मध्ये स्वतःच्या हाताने उदी देत असत. त्याकरिताही दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी आमचा नंबर लागला होता. शिवाय गुरुवारी प्रवचनस्थळी आम्हाला पुष्पवृष्टीची सेवा मिळाली होती म्हणून आम्हां सर्वांना फारच आनंद झाला होता. पण नेमके त्या दिवशी बापू काही प्रवचनास आले नाहीत. माझ्याबरोबर आलेल्यांतील काही लोकांचा धीर सुटून ते त्यावरून बापूंवर शंका घेऊन तक्रारीच्या सुरात काहीबाही बोलू लागले. त्यांचे म्हणणे होते की ‘तुम्ही म्हणता बापूंना सगळं कळतं, मग आपण एवढे लांबून एवढा खर्च करून आलो आणि बापूंनी दर्शन का नाही दिलं ?’, वगैरे वगैरे.

त्यानंतर आम्ही सद्गुरु गुणसंकीर्तनसत्संग ऐकत त्या स्कूलच्या पटांगणात बसलो असता रात्री ९ वाजता एकाच्या मोबाईलवर घरुन फोन आला की आपल्या गावामध्ये गारांचा पाऊस पडला....एवढा की संपूर्ण गावभर गारांचा दोन फुटाचा थर जमिनीवर लागला आहे. माझ्या घरूनसुद्धा फोन आला. प्रश्न होता आम्हा सर्वांच्या शेतजमिनीचा. पीकांची सर्व नासाडी झाली असणार ह्या विचाराने कोणाचेच मन त्यापुढील सत्संगात लागत नव्हते. मनात बापूंची आळवणी सुरूच होती की बापुराया, हे असे कसे झाले?

दुसर्‍या दिवशी आम्हाला गुरुक्षेत्रम् येथे बापूंच्या हस्ते उदीचा प्रसाद मिळणार होता. म्हणून आम्ही कुर्ल्याला, इंधपे येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रमुख सेवक श्री. महेंद्र निंबा पाटील यांच्या बहिणीचे घर आहे, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणार होतो. त्यामुळे वांद्रे येथून आम्ही कुर्ल्याला त्यांच्या घरी गेलो. बाकीची मंडळी ‘लगेच गावाला जायला निघूया’ म्हणून सांगत होती, पण ‘नशिबाने उदीप्रसादासाठी नंबर लागलाय, तो गमावू नका’ असे म्हणून कुर्ल्याच्या पाहुण्यांनी कोणासही घरी निघू दिले नाही व आमचा चांगला पाहुणचार केला.

ती रात्र तशीच गावच्या संकटाचा विचार करण्यात गेली. सकाळी उदी प्रसादाचा लाभ होता परंतु ह्या गारांच्या पावसाने आमच्या शेतांचे किती नुकसान झाले असेल ह्या विचाराने आमचे कोणाचेच चित्त लागत नव्हते.

शेवटी बापूलाच दया आली बहुतेक....सकाळी ७ वाजता माझ्या घरून मुलाचा फोन आला की आपल्या शेताचं विशेष नुकसान झालेलं नाही, आपल्या शेतात गारांचा पाऊस फारच कमी होता. माझा जीव भांड्यात पडला व मी उलटसुलट विचार करून सद्गुरुंना त्रास दिल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली.

आश्‍चर्य म्हणजे हे इतक्यावरच थांबले नाही, तर आम्ही जेवढे चौदाजण तिथे आलो होतो, त्यांतल्या प्रत्येकाच्याच घरून आता फोन येऊ लागले की आपलं शेत सुखरूप आहे....आपल्या शेतात गारांचा पाऊस नव्हता किंवा फारच कमी पडला! आता बोला!

असा हा माझा सद्गुरुराया....आपल्या भक्ताला तारणारे....माझे बापू!

सकाळी अचानक मिळालेल्या ह्या कलाटणीने आता सर्वांचीच मने हलकी झाली होती. त्यामुळे आम्ही हॅप्पी होम श्रीगुरुक्षेत्रम्ला उदी प्रसादाचाही आनंद घेऊ शकलो. बापू हे असेच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी छायाछत्र धरून बसलेले असतात. म्हणूनच आमच्यावरचे भयानक संकट बापूरायांनी टाळले.

बापू, तुझे ऋण कसे फेडू? आमच्याकडून चांगली सेवाभक्ती करून घे हीच प्रार्थना!


॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment