Friday 1 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 03:49 No comments
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Nandurbar

आपण सद्गुरुवर प्रेम करत असलो व त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेमाने मार्गक्रमणा करीत असलो की सद्गुरु आपल्या हातून पापं घडण्यापासून तर आपल्याला वाचवतोच, पण आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकाही तो सावरतो! अनेकदा त्या चुकांचे छोटेसे परिणाम आपल्याला भोगावयास लावून पुढील मोठ्या संभाव्य दुष्परिणामांपासून तो आपल्याला वाचवतो.
  - चंद्रकांत पाटील, नंदुरबार

माझी मनापासून काहीतरी वेगळे शिक्षण घेण्याची इच्छा होती व ती पूर्ण होण्याचा चान्स केवळ बापूंच्या आशीर्वादाने मिळाला.

मी डी.फार्मसी कोर्स बंगळुरुमधून पूर्ण केला. शिक्षण घेतानाही मला वेळोवेळी बापूंची कृपाप्राप्ती झाली. कारण राज्य वेगळे, भाषा वेगळी, त्यामुळे इंग्रजीतूनच सर्व संभाषण....ह्यामुळे अनेक व्यावहारिक अडचणी आल्या. परंतु बापूंनीच सर्व अडचणींतून तारून नेले. अगदी माझ्या परीक्षेच्या वेळेसदेखील.

त्याचे झाले असे की माझी फर्स्ट इयरची परीक्षा सुरू झाली. नेहमीप्रमाणे पेपरची तयारी झाल्यावर बापूंना नमस्कार करून, आपली संस्थेची उदी लावूनच पहिले दोन पेपर दिले. तिसर्‍या दिवशी बायो-केमिस्ट्रीचा पेपर होता. तो विषय मला कठीण जात असल्याने त्याची तयारी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होतो. पेपरला जातानाही मन अस्वस्थच होते.

सकाळी दहा वाजता पेपर सुरू झाला. बापूंचे नामस्मरण करून पेपर लिहिण्यास सुरुवात केली. साधारण तासभर झाल्यावर अचानक वर्गात मोबाईलची रिंग वाजली. मी पेपर लिहिण्यात मग्न होतो, त्यामुळे असेल कोणाच्यातरी मोबाईलची बेल, असे म्हणून तिथे दुर्लक्ष केले. नंतर परत पाच मिनिटांनी रिंग वाजली. ह्यावेळेस मात्र माझ्या आणि एक्झॅमिनरच्या एकाच वेळी लक्षात आले की माझाच मोबाईल वाजत होता! माझे तर धाबेच दणाणले. खरे तर नजरचुकीनेच व बेसावधपणानेच तो मोबाईल खिशात राहिला होता. आता आपले काय होणार, परीक्षेला बसू देणार की नाही ह्या कल्पनेने मी चांगलाच बेचैन झालो. बापूंचा धावा करू लागलो की ‘चूक झाली बापुराया, आता तूच वाचव!’

मग सगळा धीर एकवटून मी एक्झॅमिनरला मनापासून विनंती केली की ‘माझ्याकडून चुकून मोबाईल खिशात राहिला. प्लीज, माफ करा. असं पुन्हा होणार नाही.’ कदाचित माझा प्रामाणिकपणा जाणवल्यामुळे त्याने फक्त माझा मोबाईल काढून घेतला, पण पेपर लिहिण्यास संमती दिली.

हा अनुभव इथेच संपत नाही. त्या एक्झॅमिनरकरवी माझा फोन जप्त करवून माझ्या बापूंनी मला पुढच्या किती मोठ्या संकटातून वाचवले होते, हे दहाच मिनिटांत मला कळले.

कारण दहाच मिनिटांनी एक्झॅम हॉलमध्ये युनिव्हर्सिटी स्क्वॉडने प्रवेश केला. माझा बॅज नंबर ३ होता. स्क्वॉडने धडाधड एकामागोमाग एक अशा अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढले व त्यांची तपासणी केली. बॅज नंबर ४ च्या विद्यार्थ्याच्या खिशात मोबाईल सापडला आणि त्याचा मोबाईल स्विच-ऑफ असूनही त्याला बाहेर काढण्यात आले. तो तर कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता. त्यामुळे त्याच्या बाबतीत प्रिन्सिपॉलनी स्वत: विनंती केली, परंतु त्यांच्या रदबदलीचाही काही फायदा झाला नाही. त्याच्यावर ‘मालप्रॅक्टिस’चा गुन्हा दाखल करून त्याचा मोबाईल जप्त केला गेला आणि सुपरवायझरलाही नोटीस दिली गेली.

हे सर्व नाट्य बघून मी हबकलोच होतो आणि मनोमन बापूंचे आभार मानत होतो की त्यांनी हा स्क्वॉड येण्याच्या अगोदर दहा मिनिटांपूर्वीच माझ्या मोबाईलची रिंग वाजवून मला अलर्ट केले होते व केवळ मोबाईल जप्त होण्यावर भागले होते.

माझे वर्ष वाचवून बापूंनी कितीतरी मोठ्या संकटातून मला बाहेर काढले होते. वर्ष फुकट जाणे तर आम्हाला परवडण्यासारखेच नव्हते कारण हा कोर्स करण्यासाठी घरच्यांनी ७० हजार रु. फी भरली होती. ते पैसे शेती करून मेहनतीने मिळवले होते.

माझा जप्त केलेला मोबाईल त्या सुपरवायझरने दोन वर्षानी मला परत केला. त्यामुळे तो ‘मिस्ड कॉल’ कोणाचा होता हे मी पाहू शकलो नाही. परंतु माझी खात्री आहे की तो माझ्यासाठी बापूंनीच दिलेला इशाराच होता!

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment